LADKI BAHIN YOJANA | गोष्ट एका बहिणीची संध्याकाळी कामावरून घरी आल्यावर पप्पांना रोज बातम्या आणि त्या बातम्यांसोबत तेवढाच छान कडक कडक चहा घेण्याची सवय होती.
नेहमीसारखंच आज पण सगळं छान चालू होतं.बातम्या,चहा असं निवडणुकांच्या बातम्यांमध्ये एकदमच एक बातमी आली लवकरच सगळ्या बायकांना दर महिन्याला बँक खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत.
सरकार च्या या निर्णयाने पप्पा खूप खूश होते.हातातला चहा तसाच टेबल वर ठेवत घाई घाईने उठून पटकन स्वयंपाक घरात गेले आणि आई ला ही आनंदाची बातमी सांगू लागले.
थोडे थोडके का होईना पण ते पैसे पण आई बाबांसाठी खूप होते.
कारण घरात काही खायला नसताना पाणी पिऊन,कधी भाकरी पाणी आणि मिठासोबत चुरून खाऊन दिवस काढले होते.पप्पांच्या आणि आईच्या घरी पहिल्यापासून गरिबी असल्यामुळे दोघांनी हलाखी मध्ये दिवस काढले होते.
पण त्यांच्या या कष्टाला आणि धैर्याला यश मिळाले ते जेव्हा पप्पांना सरकारी नोकरी मिळाली.खूप खूश होते दोघं.
आता सगळं छान होईल,काही अडचण येणार नाही असा विचार करत दोघे स्वप्न रंगवू लागले.उज्वल भविष्याची स्वप्ने विणू लागले.
पण म्हणतात ना सुख हे काही दिवसांसाठीच असतं तसंच झालं.
बाबांना म्हणजे सृष्टी च्या आजोबांना किडनी चा त्रास होऊ लागला. दर आठवड्याला नवीन रक्त चढवण्यासाठी बाबांना न्यावं लागायचं. आणि अशाप्रकारे मिठाचा खडा पडला. आता तो दवाखान्याचा खर्च बाकी घरातले खर्च हे सगळं जमवता जमवता पप्पा आणि आईची फार फरफट होत असे.कारण पप्पांवर बाबांची,काकू ( सृष्टीची चुलती) आणि बायको,सृष्टी ची जबाबदारी होती.काकू विधवा होती पण घरामध्ये रुबाब खूप होता.सृष्टीचा चुलता सृष्टी लहान असतानाच मरण पावला होता.
LADKI BAHIN YOJANA | गोष्ट एका बहिणीची जुगार च्या नाशकारी सवयीमुळे काकांचा अंत झाला होता. नेमकं काय झालं होतं हे माहित नव्हतं सृष्टीला.कारण लहानापासून काकांविषयी खूप कमी ऐकलं होतं आणि जेव्हा कधी काही विषय निघालाच तर फक्त आणि फक्त भांडणं च होत होती. काकू पप्पांवर माझ्या नवऱ्याला वाचवलं नाही असा आरोप पप्पांवर करत असे.आई ने मध्ये काही बोलण्याचा प्रयत्न केला तर आईचा अपमान करत असे.
आई आणि पप्पांची काही चूक नसताना देखील दोघं का काकूचं ऐकून घेतात हा प्रश्न सृष्टीला नेहमी पडायचा.
एवढ्या सगळ्यांची जबाबदारी पार पाडता पाडता दिवस चाललेच होते तेव्हा आणि हीच गोष्ट कमी का काय म्हणून अजून एका संकटाने दार ठोठावलं. आई आजी (म्हणजे सृष्टीच्या आईची आई) एक दिवस गादीवरून पडली आणि पायाचा खुबा निकामी झाला.तरी पण थोडी फार तरी हालचाल करता यावी यासाठी आई आजी ला दवाखान्यात वेळेत नेऊन उपचार करणे खूप गरजेचे होते. एवढी बिकट परिस्थिती असून देखील पप्पांनी क्षणाचा देखील विलंब न करता आई आजी ला घरी आणण्याचे ठरवले.
आता आई वर कामाचा खूप ताण येऊ लागला.स्वतःच्या आईचं बघायचं, सासऱ्यांकडे लक्ष द्यायचं.त्यात जाऊबाई चे टोमणे ऐकायचे.काकू तर घरातल्या एकापण कामाला हात लावायची नाही. आईची होणारी एवढी दगदग सृष्टीला पाहवेना त्यामुळे सृष्टीने आई ने न सांगता न विचारता घरातल्या छोट्या मोठ्या कामांमध्ये मदत करायला सुरुवात केली.
मग ते सकाळी लवकर उठून अंथरूण पांघरून काढून त्याच्या नीट घड्या घालून ठेवणे,लगेच सगळं घर झाडून घेणे. मग फरशी पुसणे. एवढ्या लहान वयात सृष्टीला एवढी समज आहे हे बघून पप्पा आणि आई ला सृष्टीचा खूप अभिमान वाटत असे.
LADKI BAHIN YOJANA | गोष्ट एका बहिणीची
या सगळ्या गोष्टी पप्पांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून सृष्टीला त्या दिवशी आठवल्या.सृष्टी देखील आई साठी आणि काकू कशी का असेना पण काकू साठी पण सृष्टी खूश होती. कारण काकूला देखील पैसे मिळणार होते.दुर्दैवाने पायाच्या दुखण्यामुळे आई आजी मागच्याच वर्षी देवा घरी गेली होती.नाहीतर आई आजीला पण पैसे मिळाले असते.
आज फक्त पैसे मिळणार असल्याची बातमी आली होती.अजून त्या बद्दल कोणालाच काही माहीत नव्हते. तो दिवस आनंदात मावळला.दुसऱ्या दिवशी आई पटापट आवरून कामावर निघाली.आई ज्यांच्या घरी कामाला जायची ते दोघं नवरा बायको सकाळी ८ वाजता कामाला जाण्यासाठी घर सोडायचे,
त्यामुळे आईला लवकर निघावे लागत असे.ते दोघे नवरा बायको त्यांच्या त्यांच्या कामावर गेले, आणि मग आईचे काम चालू व्हायचे.त्यांच्या पोरांचं (अमित आणि आम्रपाली) आवरायचं त्यांना शाळेत सोडायचं आणि मग घरातलं सगळं आवरून श्री व सौ. विभांडिक यांना त्यांच्या ऑफिस मध्ये दुपारच्या जेवणाचा डबा पाठवायचा.असा काहीसा आईचा दिनक्रम असे.
अमित आणि आम्रपाली ला शाळेत सोडून आल्यावर आई फरशी पुसता पुसता रेडिओ लावून गाणी ऐकायची नाहीतर टीव्ही वर बातम्या बघायची आईला सवय होती.त्यादिवशी असच फरशी पुसता पुसता पैसे मिळण्याच्या योजनेबद्दल काही नवीन बातमी आली आहे का? हे बघावं असं आईच्या मनात आलं.म्हणून बातम्या लावल्या.तेव्हा कळालं त्या पैसे मिळणाऱ्या योजनेचे नाव लाडकी बहीण योजना आहे म्हणून. आता पुढे काय सांगणार आहेत याकडे आईचे लक्ष होते.
आणि पुन्हा एकदा मिठाचा खडा पडला. लाडकी बहीण योजनेतून पैसे मिळणार होते पण फक्त त्याच बायकांना ज्यांचं संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमी होतं, आणि बाकी अजून काही अटी शर्ती होत्या. पण त्या सगळ्यात एकदम महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील स्त्रियांना ही योजना लागू होत नव्हती. हे ऐकून आईच्या डोळ्यात खरकन पाणी आलं.कारण सृष्टीचे पप्पा सरकारी कर्मचारी होते.
आता आपल्याला पगार किती आहे किती नाही याचे कोणाला काही देणं घेणं नव्हतं. आणि जरी खूप पगार असला तरी त्या पगारापेक्षा खर्च किती आहेत याचं कोणाला काय करायचंय ना?
४ वाजता अमित ला आणि आम्रपाली ला आई शाळेतून घरी घेऊन आली.काहीवेळाने त्यांचे आई वडील आले. आणि विभांडिक काकू खूप उत्सुक होऊन घाई घाईने आईला विचारू लागल्या काय हो कांबळे काकू लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरला की नाही? आणि आई ढसाढसा रडू लागली.विभांडिक काकूंना काही कळेना आई ला अचानक काय झालं ते.
LADKI BAHIN YOJANA | गोष्ट एका बहिणीची आई काही न बोलता घरी आली आणि आल्या आल्या रडण्याचा आवंढा गिळण्यासाठी पाणी पिऊ लागली.
सृष्टीने परत परत विचारल्यावर आईने सांगितलं.सृष्टी ला ऐकल्या नंतर त्या गोष्टीचं एवढं काही गांभीर्य असं वाटलच नाही. पण सगळं काही ठीक होईल असं म्हणत म्हणत आईची समजूत काढू लागली.रोज संध्याकाळी कामावरून घरी आल्यावर बातम्या बघण्याची उत्सुकता आज पप्पांच्या पण चेहऱ्यावर दिसत नव्हती.आज ना चहा ना बातम्या काहीच कडक वाटत नव्हत्या.
आई चा चेहरा बघूनच आई ला कशाचे दुःख झाले आहे हे पप्पांना कळालं होतं.
रात्रीच्या स्वयंपाकाची गडबड चालू होती तेव्हा कोथिंबीर मागायला आलेल्या साळुंखे काकू मात्र एकदम खूश होत्या.
गंमत अशी की आईच्या दुःखाचं जे कारण होतं तेच साळुंखे काकूंच्या सुखाच कारण होतं. काय हो कांबळे लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला की नाही मी आणि शुभांगी ने ( साळुंखे काकूंची मुलगी) आजच भरला बघा अर्ज आणि सबमिट पण झाला अर्ज.शुभांगी आणि सृष्टी पहिली ते दहावी एकाच वर्गात होत्या.
आता साळुंखे काकूंना काय सांगायचं,उलट त्यांनी विषय काढून परत आई ला दुखावलं होतं.त्यांची तरी काय चूक म्हणा,त्यांना कुठे माहीत होतं काय झालं ते.
कोथिंबीर घेतली आणि जाता जाता साळुंखे काकू म्हणल्या तुम्हाला काय म्हणा अर्ज नाही भरला तरी सृष्टीचे पप्पा सरकारी नोकरी करतात पगार काय कमी असणार आहे का?
त्यांचं हे मुद्दाम असं टोचणे सृष्टीला अजिबात आवडलं नाही.सृष्टीला असं वाटलं आता त्यांच्या हातातून कोथिंबीर हिसकावून घ्यावी आणि द्याव घरातून हाकलून.
एकतर कधी स्वतःच्या पैशातून काही आणायचं नाही आणि वर सारखं हे असं घालून पाडून बोलायचं.शुभांगी च्या पप्पांचा ( साळुंखे काकांचा ) भाजीचा धंदा होता.
भाजीच्या धंद्यावर मुंबईत एक फ्लॅट आणि पुण्यात एक फ्लॅट व जमीन साळुंखे काकांनी घेतली होती. पण कधीच कोणाला कानोकान खबर नव्हती. आणि साळुंखे काकू मात्र घरात काही कमी पडले की तोंड वर करून निर्लज्जासारखं उठ सूट हे ना ते घ्यायला घरी यायच्या.
त्यांची एवढी अधिक संपत्ती आहे हे एकदा चुकून बोलता बोलता शुभांगी च बोलून गेली होती.म्हणून सृष्टी आणि घरच्यांना माहित होतं, पण पप्पा आणि आईचा स्वभाव कधी कोणाला न दुखावणारा त्यामुळे साळुंखे काकूंच चांगलं फावलं होतं
आणि त्याचमुळे आजपर्यंत कदाचित काकू देखील चांगलेच पाय रोवून घरात काही काम न करता आई आणि पप्पांच्या जीवावर फुकटच खात राहत होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेज ला गेल्यावर सृष्टी च्या मैत्रिणी देखील सृष्टीला लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरला का म्हणून विचारत होत्या,पप्पांच्या सरकारी नोकरीचे कारण देत सृष्टीने विषय बंद केला. पण तरी देखील सृष्टीच्या मनामध्ये एक खंत राहिली होती.आजपर्यंत पप्पांनी एवढे प्रामाणिकपणे काम केले त्याचे हे फळ आपल्याला मिळाले का? असा विचार सारखा सृष्टीच्या मनात येत होता.
LADKI BAHIN YOJANA | गोष्ट एका बहिणीची
आपण केवळ सरकारी नोकरदार आहोत या एका कारणामुळे आपण वेगळे ठरतो का?
का फक्त दुसऱ्यांच्या फायद्याच्या वेळेसच आपल्याला सरकारी कामगार म्हणून ग्राह्य धरले जाते?
कर भरताना,इतर काही काम असल्यावर सर्व सामन्यांसारखीच आपली पण ओळख असते,आपल्याला वागणूक मिळते.त्यावेळेस का नाही मग काही सूट मिळत.
मग अशा योजनांच्या वेळेस च का आपल्याला निव्वळ सरकारी कर्मचारी असल्याच्या कारणावरून वेगळ काढलं जातं,आम्ही माणूस नाही का? आम्हाला काही गरजा,खर्च नाही का? जर इतर लोकं महिन्याला लाखोने कमाई करून सुद्धा सगळ्या सरकारी योजनांचा फायदा घेऊ शकतात
आणि ते पण कागदांमध्ये फेरबदल करून जो कोणी तपासून पण बघत नाही. मग आमच्याच वार्षिक उत्पन्नाचा,सरकारी कर्मचारी असण्याचा पुरावा कसा काय तपासला जातो आणि आम्हाला फायद्यापासून वंचित ठेवलं जातं?
असे खूप सारे प्रश्न सृष्टीला सतावत होते पण त्याचे उत्तर एक आणि एकच होते,काहीही झालं तरी आपल्याला या योजनेचा फायदा मिळणार नाही.बाकी आजी आजोबांच्या दवाखान्यासाठी कधी काही लागलंच तर आपल्याला मदत मिळते या विचारावर समाधान मानून गप्प बसणे कधी पण योग्य.
तर मग वाचक रसिक हो, एका दुसऱ्या विषयाला गोष्टीच्या माध्यमातून हात घालण्याचा आमचा हा प्रयत्न कुठपर्यंत योग्य ठरला हे आम्हाला माहीत नाही, पण एवढं नक्कीच की सृष्टी सारखे असे अनेक लोक असतील ज्यांना सरकारी नोकरदाराच्या परिवाराचा भाग असल्याचे फायदे कमी पण तोटेच जास्त अनुभवण्यास मिळतात
लवकरच भेटुयात एका नवीन गोष्टीसोबत तोपर्यंत खूश राहा,आनंदी राहा,वाचत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर काम करत राहा.
धन्यवाद!!!!
LADKI BAHIN YOJANA | गोष्ट एका बहिणीची
आमचे काही इतर लेख आणि गोष्टी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
रिया ची गोष्ट
माझी शाळा सुंदर शाळा
True Friendship Story
My Diary