MY DIARY नमस्कार वाचक रसिक मंडळी आतापर्यंत रिया,जानकी आणि ऐश्वर्या,रेणुका अशा विविध पात्रांची आपण गोष्ट वाचली.
पण आज एक नवीन सत्र चालू करण्याचा आम्ही विचार केला आहे.
आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक वेळा अशा काही चित्र विचित्र गोष्टी घडतात की त्या आपण कधी विसरतच नाही,म्हणजे रोज त्या गोष्टींची आठवण नाही काढली तरी कधी असे काही प्रसंग घडतात की त्या चित्र विचित्र आठवणी पुन्हा ताज्या तवान्या होऊन आपल्या समोर उभ्या राहतात.
काही आलेले भयानक नाहीतर डोकं अशांत करणारे अनुभव आपण नेहमीच कोणाला सांगू शकू असे नाहीये मग कधी त्या मधून बाहेर पडण्यासाठी त्या गोष्टी कागदावर उतरवून देखील डोकं हलकं होऊ शकतं.अशाच एका कल्पनेतून आम्ही एक नवीन सत्र चालू केले आहे My Diary ज्यामध्ये असे काही छान तर काही हादरवणारे काल्पनिक किस्से, गोष्टी आपण या डायरी च्या माध्यमातून नाहीतर दैनंदिनी च्या माध्यमातून सादर करणार आहोत.
तर सादर आहे असेच एक स्वप्न
वर्षाचा रेल्वे भरतीचा निकाल आला होता.सगळेच खूप खूश होते. एकदाची सरकारी नोकरी मिळाली या विचाराने वर्षा खूप उल्हसित होती. पुढच्या महिन्यात कामावर रुजू पण व्हायचे होते. तसे पत्र देखील वर्षाला आले होते. त्यामुळे वर्षा आता सगळं आवरण्याच्या मागे होती आणि गंमत म्हणजे काम पण राहत्या गावात असलेल्या रेल्वे स्थानकावर च होते.
तयारी करता करता एक एक दिवस कधी गेला ते कळाले पण नाही आणि नोकरीचा पहिला दिवस उजाडला देखील.
सकाळी लवकर उठून आईने वर्षा ला सगळं आवरून दिलं.आणि आज पहिला दिवस असल्यामुळे वर्षा ला सोडवायला पप्पा येणार होते.वर्षाचे खूप लाड चालू होते.
आणि वर्षा पप्पांना घेऊन निघाली.पत्ता शोधताना थोडा प्रॉब्लेम आला पण एकदाचं ऑफिस मिळालं.
आत मध्ये गेल्यावर अगोदर नोकरी वर नवीन रुजू होत असल्याचं बद्दल माहिती वरिष्ट अधिकाऱ्यांना देण्याची होती त्यामुळे वर्षा पहिल्याच एका इमारतीमध्ये गेली.तिथे गेल्यावर तिला एक महिला अधिकारी भेटल्या.वर्षाच्या चेहऱ्यावरील आनंद आणि काम चालू करण्याची उत्सुकता बघून त्या मॅडम ने देखील वर्षाचे कागदपत्र लवकर तपासून वर्षाला मोकळे केले.
My Diary
आता नंतर एका सराना देखील भेटायचं होते म्हणून वर्षाला थांबवलं होते.पण त्यांना आता भेटणे शक्य नाहीये हे कळल्यावर त्या मॅडम ने वर्षा ला तू पुढे जा असं सांगितलं.वर्षा आणि मॅडम ची ही पहिलीच भेट होती पण या पहिल्याच भेटीत मॅडम वर्षाचा आनंद बघून खूप खुश होत्या.
मॅडम ने तिला गेट मधून पुढे जा असं सांगितलं तिथे लगेच स्थानक दिसेल असे देखील सांगितले.पण वर्षा नवीन असल्यामुळे आत मध्ये जाताना सारखी बिचकत होती.शेवटी तिला जिथे काम करायचे होते ती इमारत मिळालीच. पण इमारतीमध्ये प्रवेश केल्यावर काहीच कळत नव्हते.कुठे वळायचं कुठे जायचं काहीच कळायला मार्ग नव्हता.
तेवढ्यात तिथून जाणाऱ्या एका मावशींना वर्षाने इमारतीमधील कचेरी बद्दल विचारलं.त्या मावशींनी सांगितलं नाही इथे नाहीये ती कचेरी या मी तुम्हाला घेऊन जाते.आणि वर्षा आता मावशींसोबत निघाली.पुढे गेल्यावर एक सडीक पडीक असा रेल्वे मार्ग होता.खूप गवत वाढलेला.लोकांची जुनी,फाटकी, खराब कपडे,कुत्री, मांजरी असणारे असे ठिकाण होते.
वर्षा प्राणीप्रेमी असल्यामुळे क्षणात तिला कचेरी मध्ये वेळेवर पोहचायचे आहे हे विसरली आणि प्राण्यांमध्ये रमून गेली.मावशींसोबत चालत चालत कधी एका अंधाऱ्या बोगद्यात प्रवेश केला हे वर्षाला देखील कळाले नाही.पुढे चालत चालत मावशींसोबत प्राण्यांविषयी गप्पा टप्पा चालू झाल्या.त्या रुळावर दिसणाऱ्या प्राण्यांविषयी वर्षा एवढी भरभरून बोलत होती की तिचा आज नवीन कामाचा आणि त्यात पण सरकारी नोकरीचा पहिला दिवस होता हे सगळं सगळं विसरली होती.
My Diary
मावशींसोबत चालत असताना कधी एक माणूस त्यांच्या मागे मागे त्यांचा पाठलाग करू लागला हे वर्षाला समजलेच नाही.आणि अचानक तो अंधारा बोगदा एका कोपऱ्यात संपला,पण पुढे जायला मार्ग पण नव्हता.मावशींना देखील रस्ता माहीत नाही या विचाराने वर्षा मागे वळून परत परतीच्या मार्गाने निघाली.पण इतका वेळ छान बोलणाऱ्या मावशी एकदम चिडून रागाने थांब असं मोठ्याने ओरडल्या.त्यांच्या आवाजातला तो बदल वर्षाने अगदी पटकन चुटकीसरशी पकडला.वर्षा पटकन तिथून निसटायच्या प्रयत्नात होती.पण तो पाठलाग करणारा माणूस खूप वेगाने पळू लागला.
पण दक्षिण भारतीय सिनेमात दाखवताना त्या प्रमाणे वर्षा मध्ये काय कोठून कशी ताकत आली देव जाणे आणि वर्षा हवेसारखी एकदम त्या बोगद्यातून बाहेर पडली.आणि परत तिथेच आली जिथून त्या मावशींनी वर्षाला नेलं होते.तिथे खूप लोक असल्यामुळे ते दोघं मागे आले नाहीत असा समज वर्षाचा होता,पण इमारतीमध्ये असणाऱ्या कोणालाच ते दोघं दिसत नव्हते. काय प्रकार होता माहित नाही,पण जीव वाचला या एकाच विचाराने वर्षा सुखावली होती.
गंमत अशी की ऑफिस मध्ये जायला ज्या उद्वाहक(लिफ्ट) चा उपयोग सगळे करत होते.ती लिफ्ट म्हणजे एक चित्र विचित्र, आगळी वेगळी च गोष्ट होती.संपूर्ण भिंत एक सारखी सपाट दिसत असल्यामुळे नेमकी लिफ्ट आहे कुठे हे काही वर्षाला कळलं नव्हतं त्यामुळे एवढ्या मोठ्या संकटाला वर्षाला सामोरे जावं लागलं होतं.आणि आता खूप लोक आजूबाजूला असल्यामुळे नेमक कळल तरी की लिफ्ट अशी लपलेली होती.
आता लिफ्ट उघडली बघितलं तर अजून एक धक्का.
हे बघून तर वर्षा चक्कर येता येता राहिली.लिफ्ट मध्येच शौचालय होते.म्हणजे हे होऊच कसं शकत,एवढी घाण कशी काय असू शकते?वर्षा बाकीच्या लोकांसोबत कशीतरी लिफ्ट मध्ये गेली,आणि आता रोज अशा भयानक ठिकाणी यायचं का या विचाराने ग्रासून गेली.
कामाचा पहिला दिवस छान गेला पण घरी जाताना सकाळी आलेल्या अनुभवाने वर्षाच मन खूप भरून आलं होतं.
कधी एकदा घरी जाईल आणि आई ला सगळं सांगेन असं झालं होतं.घरी गेल्यावर जशी समोर आई दिसली तशी वर्षा रडायला लागली.आई आज ना सकाळी ना मी ऑफिस ला गेल्यावर…..(काय झालं हे सांगणार तेवढ्यात वर्षाच स्वप्न मोडलं).
आणि आईच वर्षाला झोपेतून उठवत होती.कारण सकाळचे ४ वाजले होते आणि पाणी भरायचं होतं.समोर जेव्हा आई दिसली तेव्हा वर्षाला रडाव, हसावं असं काहीच नाही वाटलं पण स्वप्न मोडल्याचं दुःख झालं होतं.वर्षाला बघायचं होते पुढे काय घडतंय ते.पण नेमके ४ वाजले आणि झोप मोड झाली. My Diary
झोप काही पूर्ण झाली नव्हती म्हणून पाणी वगैरे भरून झाल्यावर ६ च्या दरम्यान वर्षा परत झोपायला गेली.झोपताना वर्षा पुन्हा त्या स्वप्नाचा विचार करत होती कारण तिला वाटत होतं परत विचार केला तर तेच स्वप्न परत दिसेल.
हळू हळू वर्षा कधी झोपून गेली तीच तिलाच समजल नाही.
थोड्या वेळाने जेव्हा परत उठली तेव्हा एकदम पहाटे बघितलेलं स्वप्न वर्षा विसरली पण होती,आणि नेहमीच्या कामाला लागली.काम करता करता आई सोबत बोलत असताना अचानक पहाटे एक स्वप्न पडल होतं याची वर्षाला आठवण झाली.पण आता सगळ्या गोष्टी खूप धूसर होत्या.कशाचाच कशाला मेळ नव्हता.काहीच आठवत नव्हतं.शेवटी वर्षाने नाद सोडून दिला.
तुमच्यासोबत होतं का कधी असं,एखादे स्वप्न पूर्णपणे बघण्याची इच्छा असते पण नेमकं काहीतरी मधेच येत आणि ते स्वप्न बघायचं राहूनच जातं.आणि जेव्हा झोपेतून पूर्णपणे जागे होता तेव्हा ते स्वप्नच आठवत नाही, सगळं असं एकदम विस्कटल्यासारखं समोर येतं.आणि नंतर त्या स्वप्नाचा काही फरक पण पडत नाही.
ज्या स्वप्नामुळे आपण झोपेमध्ये खूप साऱ्या चांगल्या वाईट गोष्टी अनुभवतो त्याच गोष्टी काही तासातच आपल्यासाठी तेवढ्या महत्त्वाच्या नसतात ना आपल्या स्वतःच्याच भावना ज्या आपण मनापासून स्वप्नामध्ये नाहीतर त्यावेळेस झोपेत असताना अनुभवलेल्या असतात.
मग खऱ्या आयुष्यात अनेक वेळा एखाद्याच्या बोलण्यामुळे का एवढा परिणाम आपल्या मनावर होतो?
का आपण एवढे दुखावलो जातो?
खोलवर जखम झाल्याचं जवळच्याना सांगत असतो.कधीकाळी घडलेली गोष्ट पुन्हा पुन्हा तेवढ्याच प्रकर्षाने अनुभवत असतो.
त्याच दुःखाची जाणीव पुन्हा पुन्हा होऊन नव्याने रडत असतो.आणि दुःखाच्या आठवणी ताज्या करत असतो.
काही वैज्ञानिक कारण असेल का या गोष्टी मागे?
MY DIARY कारण नेहमीच्या खऱ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींपेक्षा पण जास्त दाहक आणि त्रासदायक गोष्ट आपण स्वप्नात बघितलेल्या असतात तरी काही वेळा नंतर त्यांचा परिणाम शून्य असतो.
बर फक्त दुःखाच्याच बाबतीत असं होतं असही नाही,काही खूप छान सुख देखील स्वप्नांमधून आपल्याला भेटायला येतात पण त्यांचा देखील आपल्याला विसर पडतो,आणि त्या विसर पडण्याच्या मागे सुद्धा आपली दैनंदिन जीवनातील धावपळ,चढाओढ असते ज्यामुळे अनुभवलेले सुख सुद्धा आपण विसरून जातो.
ही गोष्ट खरंच विचार करण्यासारखी आहे,की आपण खरंच एवढं महत्त्व द्यायला पाहिजे का? एखाद्या गोष्टीला की त्या गोष्टीमुळे अनुभवलेले सुख सुद्धा आपण विसरत आहोत.
असो,आजचा आपला लेख इथेच थांबवूयात आणि अशाच नवीन नवीन गोष्टी नाहीतर अनुभवासोबत भेटत राहूयात या आपल्या नवीन My Diary या सत्रामध्ये.
तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा वाचत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर काम करत राहा.
आपले काही इतर लेख,आणि गोष्टी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
जानकी आणि ऐश्वर्या ची गोष्ट भाग एक
धन्यवाद!!!!! MY DIARY