MY DIARY | आज पवन चा ऑफिस चा पहिला दिवस होता.पहिल्यांदाच असं एखाद्या प्रोफेशनल ऑफिस मध्ये तो आला होता.या आधी कधी असं ऑफिस वगैरे त्याने पाहिलच नव्हतं,आणि महत्त्वाचं म्हणजे तो कधी कुठे कामाला गेलाच नव्हता.
पहिल्यांदा अशा नव्या वातावरणात आल्यामुळे तो थोडा बिथरलेल्या अवस्थेत होता.आज त्याचा ऑफिस चा पहिलाच दिवस असल्याने त्याला कोणतीही चूक करायची नव्हती त्यामुळे तो एकदम वेळेत आला होता.ऑफिस ला आल्यावर बघतो तर काय,ऑफिस अजून उघडलंच नव्हतं.पवन ची मैत्रीण गायत्री देखील पोहचली नव्हती.पवन आणि गायत्री ची कॉलेज पासून मैत्री होती त्यामुळे तिच्या ओळखीने पवन ला हे काम मिळालं होतं.
हळू हळू सगळे लोक कामावर येऊ लागले.पवन खूप टेन्शन मध्ये होता.काम करायला जमेल की नाही,काम चुकलं तर असे एक ना अनेक प्रश्न त्याला सतावत होते.काम होतं पण तसं अवघड पण अगदीच जमणार नाही असं पण नव्हते.एकदा माणूस शिकला की काही अवघड नव्हतं.पहिले काही दिवस ट्रेनिंग चे होते,ट्रेनिंग मध्ये तुम्ही चांगलं शिकले की मग दुसऱ्या महिन्यापासून लगेच पगार चालू होत होता.
पहिल्यादिवशी एवढी गजबज बघून पवन ला वाटलं की इथे काही त्याचा ठाव लागणार नाही.कामाचा प्रेशर च तेवढा असायचा.पण आपण काही चुकलो नाही पाहिजे,आपल्याला काम नीट जमलं पाहिजे.पगार घ्यायचा तर काम पण नीट करावं या मताचा होता पवन.एक एक दिवस असाच पुढे पुढे चालला होता.पवन रोज एकदम वेळेत ऑफिस मध्ये हजर असायचा.काम पण मनापासून शिकायचा,काही जमत नसेल तर स्वतःहून पुढाकार घेऊन लोकांना विचारायचा.
MY DIARY
काही दिवसांनी गायत्री कामाला येणं बंद झाली. म्हणजे गायत्री ने काम सोडलं नव्हतं पण तिला रोज एवढ्या लांब येणं जाणं जमत नसल्यामुळे तिने घरून काम करण्याची परवानगी मालकाकडून घेतली होती.आणि नवीन लोकांमध्ये जास्त कोणाशी ओळख नसलेला पवन या गोष्टींपासून अनभिज्ञ होता.एक दिवस मग त्यानेच स्वतःहून गायत्री ला फोन केला तेव्हा त्याला हे सगळं समजलं.त्या दिवशी पवन एक नवीन गोष्ट शिकला,गायत्री ने आपल्याला कामाला लावलं एक मैत्रीण म्हणून पण आता या पुढे ती आपली मैत्रीण नाही राहिलेली,तर आता ती एक कुलीग सुद्धा आहे,त्यामुळे ती कुलीग सारखं वागणार ना की कॉलेजच्या मैत्रिणी सारखं.
काही दिवसांनी अजून काही नवीन लोक भरती झाले.ते पण पवन सारखेच मित्र मैत्रिणींच्या ओळखीने आले होते.तोपर्यंत पवन चा पगार चालू झाला होता,पवन काम ही नीट करायला लागला होता.त्याला वाटलं आपण नवीन असताना जसं थोडं फार घाबरत तसेच हे पण नवीन आलेले मुलं मुली घाबरतील.
पण तसं अजिबात नव्हतं.ते सगळे पहिल्या दिवसापासूनच एकदम आरामात होते.आल्या पासूनच गप्पा गोष्टी आरामात ट्रेनिंग वगैरे चालू होते.कोणाची भीती नाही काही नाही.आणि त्यांचे ट्रेनिंग होऊन त्यांना पगार चालू होईपर्यंत पवन कामा मध्ये खूप पटाईत झाला होता.एकदम अचूक,वेळेत,नीट नेटके असं पवनच काम असायचं.
त्या नवीन लोकांना बघून पवनला आठवलं तो पहिल्या दिवशी आला तेव्हा त्याचा ऑफिस चा अनुभव किती वेगळा होता.सगळ्यांकडून त्याला मिळालेली वागणूक आणि आताचे ऑफिस चे वातावरण या मध्ये एकदम जमीन आणि आकाश एवढा फरक होता.गायत्री तर कधी कधी च ऑफिसला यायची पण मॅनेजर आणि बाकी कुलिग किती वेगळे होते.
पवन जेव्हा काम शिकत होता त्यावेळेस मॅनेजर ला त्याच्याकडून खूप अपेक्षा ठेवत होते,त्याच्यावर कामाचा ताण येत असे.कधी कधी गोड बोलून,हरभऱ्याच्या झाडावर चढवून, प्रसंगी चिडून घाबरवून त्याच्याकडून काम करून घेतलं जायचं.आणि कधी कधी स्वार्थापोटी कौतुक करून अजून कामाला लावलं जात होतं.
आणि अजून एक गोष्ट पवन च्या निदर्शनास आली ती म्हणजे गायत्री ने एवढं छान काम आपल्याला मिळवून दिलं,छान यासाठी की पगार वेळच्या वेळी होणे,कोणतेही सेल किंवा टार्गेट चे काम नसणे या गोष्टी चांगल्या होत्या.पण गायत्री ने कधी ऑफिस मधील लोकांविषयी पवन ला सावध केलं नव्हतं.
आणि आता आलेले नवीन लोक त्यांना असा काहीच त्रास नाहीये.बिनधास्त चूक करून मोकळे होतात.त्यांच्या चुकांची जबाबदारी देखील मॅनेजर एकदम हसत खेळत घेतो.कधी काही बोलत नाही.त्यांचे मित्र मैत्रीण स्वतःच त्यांना जास्त काम करायचं नाही असं सांगतात.
येऊन १-२ महिने नाही झाले तेच सगळ्यांनी रंग दाखवायला सुरुवात केली.उशिरा येणं काय,काम सांगितल्यावर रुसून फुगून बसणं काय.ऐकून पण दुर्लक्ष काय करणं या आणि अशा अनेक गोष्टी.
पवन ला कधी कधी वाटायचं खरच गायत्री आपली जवळची मैत्रीण आहे का? कारण इथे आल्यापासून काळजीपोटी,मैत्रीखातर अनेकदा मी च तिला मदत केली पण तिच्याकडून कधीच काही पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही.मग मला इथे कामाला लावण्यामागे गायात्रीचा काही स्वार्थ होता का?
तर त्याचं ही उत्तर त्याला मिळालं कारण गायत्री त्याला अधून मधून ऑफिस मध्ये काय चाललंय वगैरे साठी फोन करून चौकशी करत.मग पवन ला कळून चुकले की गायत्री ने तिच्या फायद्यासाठी ती सावध राहावी म्हणून आपल्याला इथे ठेवलं आहे.आपल्याला कामाला लावून आपला फायदा झाला त्यापेक्षा जास्त फायदा तिला झाला आहे.
एकदा ऑफिस मध्ये सोबत काम करणाऱ्या एका अनिल नावाच्या मुलाची कशाची तरी परीक्षा होती त्यामुळे त्याला काम करायला जमणार नव्हतं म्हणून त्याने त्याचं काम पवन वर सोपवल आणि तो बिनधास्त झाला.स्वतःचा अभ्यास केला,मग त्याच्या जवळच्या मित्रांसोबत जेवला,त्यांच्यासोबत गप्पा मारल्या आणि नंतर अर्धा एक तास छान ताणून दिली.
एक दिवस गेला,दुसऱ्या दिवशी तर सकाळी आल्या आल्याच पवन ला हे काम लागलं.पवन जुना असून पण काम करायचा आणि त्याच्या नंतर आलेले नवीन मुलं मुली आरामात येऊन बसायचे,जेवायचे,मोठ मोठ्याने गाणी ऐकायचे,गप्पा मारायचे ऑफिस ची वेळ संपली की एकदम वेळेत घरी पण जायचे.
अनिल चे काम रोज रोज पवन ला करावं लागतंय हे मॅनेजर आणि इतर सिनियर लोक बघायचे पण अनिल ला ना इतर ऐतखाऊ लोकांना कधी काही बोलायचे.उलट पवन च किती वेडा,बावळट आहे,अजून त्याची कशी आणि किती पिळवणूक करता येईल असा विचार त्यांच्या डोक्यात चालू असायचा.
MY DIARY
त्यांच्या चेहऱ्यावर पवन ला एक वेगळीच भीती पण दिसायची ती म्हणजे त्यांना वाटायचं पवन आपल्याला काही बोलेल का?वरती कोणाकडे आपली तक्रार करेल का? पण त्याचवेळेस पवन ला हे काम तुलाच करावं लागेल हे देखील सांगण्यात यायचं.
सगळे पवन ची मजाच बघत होते.काही बोलत नाही तो पर्यंत घ्या फायदा करून. येडं आहे तर कशाला शहाणे करायचं असे एक ना अनेक हावभाव त्यांच्या चेहऱ्यावर असायचे.
२ दिवस अनीलची छान मजा चालू होती.दुसऱ्या दिवशी घरी जाताना पवन ला स्वतःचा एवढा राग येत होता ना की त्याला स्वतःलाच मारून घ्यावंसं वाटत होतं.कारण पवन स्वतःच्या अगोदर दुसऱ्यांचा विचार करायचा,नकार द्यायला घाबरायचा याच सगळ्या गोष्टी आता पवन च्या चांगल्याच अंगाशी आल्या होत्या
घरी जाताना त्याला एक एक गोष्ट आठवू लागली.नवीन असताना हे सगळे लोक किती वेगळे वागले आपल्यासोबत आणि आता कसे वागतयेत. कंपनी च्या नुकसानाची भीती पवन ला वारंवार दाखवली जात.कधी सुट्टी पाहिजे असेल तर जो तो हजार प्रश्न विचारत आणि मग कुठे जाऊन पवन ला सुट्टी मिळायची.कधी उशीर झाला तर सारखं कोणाचा ना कोणाचा फोन येत असे.
असा खूप त्रास पवन ला झाला होता आणि होत होता.
हे सगळं आठवून पवन ने ठरवलंच होतं आता उद्या काही पण होऊदे पण अनिल च काम काही आपण करायचं नाही.तिसऱ्या दिवशी जेव्हा पवन कामाला गेला तेव्हा सगळे जणू त्याची वाटच पाहत होते.की कधी एकदाच पवन येतोय त्याच्यावर सगळ काम सोपवून आपण रिकामे होतोय. तयारी पण पूर्ण होती.
पवन ऑफिस मध्ये पोहचताच अनिल एकदम आनंदाने पळत पळत पवन जवळ आला, जसं की पवन आणि अनिल खूप जवळचे मित्र.आणि पवन ला म्हणाला अरे तुला माझं काम करावं लागेल आज पण.हे ऐकून मात्र पवन जाम चिडला.सगळे लोक एवढे रिकामे बसलेत त्यांना सोडून मलाच कामाला लावलं जातंय.पवन ने पण तोंडावर अनिल ला नकार दिला.
पवन चे हे कधी न बघितलेले रूप बघून सगळे थक्कच झाले.अनिल पवन ला घाबरवण्याच्या हेतूने मॅनेजर ला बोलावू लागला.मॅनेजर ला घाबरून पवन गुपचूप काम करेल असं अनिल ला वाटलं,पण पवन ने एकाच वाक्यात सांगितलं काम करायचं असेल तर करा नाहीतर राहूदेत तसचं मला काही फरक पडत नाही.आणि क्षणात ऑफिस च ते नेहमीचं आनंदी,आरामदायी वातावरण एकदम शांत आणि ताण तणावाचे झाले.
पवन च्या रागापुढे नमते घेणं मॅनेजर ला भाग पडलं,पण ती देखील त्या सगळ्यांची एक चालच होती असं म्हणणे वावगे ठरणार नाही.कारण एका बाजूला कधी ही बाहेर कुठे काम न केलेला पवन तर एकदम मुरलेल्या लोणच्या सारखे बाहेरच्या जगात वावरताना छक्के पंजे जमणारे हे मुररब्बी लोक होते.
आता ते काम पवन करणार नाही म्हणल्यावर कोणी तरी करणं आवश्यक होतं.म्हणून अनिल ने त्याच्या मैत्रिणीला साक्षीला ते काम सोपवले.पण हुशार साक्षी ने तडकाफडकी नकार दिला.त्यामुळे अनिल चांगलाच रुसला होता.मग नंतर साक्षी ला काय वाटले देवजाणे ती अनिल ची मदत करायला अनिल कडे गेली.
पण रागाने एकदम लालबुंद झालेला,एकाच दिवसात दोन वेळा नकार ऐकलेला,असलेल्या माजाची जिरवणी झालेला अनिल कोणाशी काही बोलायलाच तयार नव्हता.
पवन च्या मनात देखील खूप राग होता,पण गोष्टी जास्त डोक्यात न ठेवणे,झालं गेलं विसरून पुढे जाणं अशा स्वभावाचा असल्यामुळे पवन लगेच शांत देखील झाला.
MY DIARY
आणि अनिल सोबत बोलला देखील पण अनिल ला मात्र कोणासोबत बोलायचं नव्हतं.अनिल तर मॅनेजर वरच रुसून बसला होता.कारण नेहमी एकमेकांना सावरून घेणारे,चुका पाठीशी घालणारे कोणीच त्याच्या मदतीला आले नव्हते.
काय मग वाचक रसिक मायबाप काय शिकलात की नाही या गोष्टीतून.
अनेकवेळा असं म्हणण्यापेक्षा रोजच येतात असे प्रसंग आपल्या जीवनात आणि आपण खूप खचून जातो या गोष्टींमुळे.स्वतःबद्दल नकारात्मक विचार करू लागतो. एकाचा राग दुसऱ्यावर काढत जवळच्या माणसांना दुखावतो आणि नाती दुरावतात.
मग यावर काय उपाय असेल?
काय वाटते तुम्हाला?
कुठेतरी हे थांबायला पाहिजे बरोबर ना?
मग नाही म्हणून बघा समोरच्याला कधीतरी ही छोटीशी सुरवात करून बघा स्वतःसाठी.
खूप जड जातं नाही म्हणायला पण शिकावं तर लागेलच ना?
बरोबर ना?
चला तर मग लवकरच भेटुयात एका नव्या गोष्टीसोबत नाहीतर एका आगळ्या वेगळ्या लेखासोबत तोपर्यंत खूश राहा,आनंदी राहा,वाचत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर काम करत राहा.
धन्यवाद!!!
अजून काही मनोरंजनात्मक गोष्टी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
माझी शाळा सुंदर शाळा
रिया ची गोष्ट
True Friendship Story
मनोरंजनाची दुनिया
MY DIARY